कोल्हापूर : केंद्र सरकारने देशभरातील साखर कारखान्यांना दहा लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे. या अंतर्गत कोल्हापुरातील २० कारखान्यांना ५४ हजार ५९८ टन आणि सांगली जिल्ह्यातील ११ कारखान्यांना ३० हजार ३८५ टन साखर निर्यातीचा कोटा मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक सहा हजार ८६२ टन कोटा हुपरीच्या जवाहर साखर कारखान्याला, तर सांगली जिल्ह्यात सर्वाधिक तीन हजार ६४० टन कोटा वसंतदादा साखर कारखान्याला मिळाला आहे. ही साखर ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत निर्यात करणे बंधनकारक आहे. राज्याच्या वाट्याला पावणेचार लाख टन साखर उपलब्ध झाली आहे.
साखर निर्यातीसाठी गेल्या तीन वर्षांत एक तरी साखर हंगाम घेतलेले कारखाने यासाठी पात्र ठरवण्यात आले आहेत. या निकषानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व २१ आणि सांगली जिल्ह्यातील १६ पैकी ११ कारखान्यांना निर्यात परवानगी मिळाली आहे. ज्या कारखान्यांनी केंद्र सरकारच्या २६ जुलै २०२४ च्या आदेशाचे उल्लंघन केले आहे, त्या कारखान्यांनाही यातून वगळण्यात आले आहे. साखर कारखाने दिलेला कोटा कारखाने स्वतः किंवा मर्चंट एक्सपोर्टरमार्फत निर्यात करू शकतील. ज्यांना निर्यात करावयाची नाही त्यानी आपला कोटा ३१ मार्च २०२५ च्या आत परत करावा असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय कारखाने आपला कोटा दुसऱ्या कारखान्यास ‘डॉमेस्टिक’ कोट्याच्या बदल्यात आगाऊ मंजुरीने देऊ शकतात.