कोल्हापूर : लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३० ऊसतोड कामगारांच्या प्रस्तावांना बैठकीत मान्यता देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी सदस्य सचिव ऊसतोड कामगार जिल्हास्तरीय समिती तथा सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांनी ऊसतोड कामगारांच्या प्रस्तावांची माहिती सादर केली. आता हे प्रस्ताव कामगार कल्याण महामंडळाकडे पाठवण्यात येणार आहेत.
बैठकीला महाराष्ट्र ऊस तोडणी वाहतूक कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रा. डॉ. सुभाष जाधव, राज्य उपाध्यक्ष प्रा. आबासाहेब चौगुले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, समाज कल्याण निरीक्षक सदानंद बगाडे उपस्थित होते. यावेळी वैयक्तिक अपघात, मृत्यू, अपंगत्व वैद्यकीय खर्च, बैलजोडी मृत्यू तथा अपंगत्व याबाबत आलेल्या विविध प्रस्तावांबाबत माहिती देण्यात आली. ३० प्रस्तावांना बैठकीत मंजुरी देण्यात आली. एक प्रस्ताव नैसर्गिक मृत्यूचा असल्याचे सदस्य सचिव साळे यांनी सांगितले. जिल्ह्यात आणखी काही प्रस्ताव असल्यास याबाबत माहिती कारखानदारांकडून मागवून घ्या, अशी सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी केली आहे. ऊसतोड कामगारांच्या अपघाताबाबतची माहिती दरवर्षी कारखानदारांकडून घेण्याची प्रक्रिया राबवावी याबाबतही त्यांनी सूचना केल्या.