कोल्हापूर : ‘दत्त साखर कारखान्यासाठी ६१.३७ टक्के मतदान, आज निकाल

कोल्हापूर : शिरोळ येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी बुधवारी ६१.३७ टक्के मतदान झाले. भरपावसात कारखान्याच्या कार्यस्थळावर २६ हजार ७२६ मतदारांपैकी १६ हजार ६०८ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. बुधवारी मतदान प्रक्रिया उत्साहात पार पडली. ९ इमारतींमध्ये ६७ मतदान केंद्रांवर मतदान झाले. अ वर्ग ऊस उत्पादक गटाच्या १६ जागांसाठी २२ उमेदवार, अ वर्ग ऊस उत्पादक महिला गटाच्या २ जागांसाठी ३ असे एकूण २५ उमेदवार रिंगणात आहेत. आज, गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. लवकरच चित्र स्पष्ट होईल.

मतदानावेळी कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील व सत्ताधारी आघाडीचे उमेदवार, तर विरोधी आघाडीचे आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांच्यासह उमेदवार मतदारांच्या स्वागतासाठी होते. शिरोळ तालुक्यातील आणि कर्नाटक सीमाभागातील मतदार असणाऱ्या मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी होती. हातकणंगले तालुक्यातील मतदार असणाऱ्या मतदान केंद्रावर तुरळक गर्दी दिसत होती. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा उपनिबंधक सुनील धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान झाल्यानंतर सायंकाळी मतपेट्या सुरक्षितरीत्या तहसील कार्यालयात ठेवून त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला.

साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here