कोल्हापूर : हरळी (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात (गोडसाखर) २९ कोटींचा गैरव्यवहार झाल्याची फिर्याद कारखान्याचे लेखा परीक्षक सुशांत फडणीस यांनी शुक्रवारी गडहिंग्लज पोलिस स्थानकात दाखल केली आहे. त्यानुसार तत्कालीन अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. कारखान्यात बेकायदा डिस्टिलरी विस्तार, जुना गिअर बॉक्स खरेदी व बॉयलर यामध्ये ११ कोटी ४२ लाख ६४ हजारांचा घोटाळा उघडकीस आला आहे. तर आधुनिकीकरण विस्तारीकरण व खरेदीमध्ये अनियमिता झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
कारखाना आर्थिक अडचणीत आल्यानंतर दहा वर्षांपूर्वी २०१३ मध्ये कामगारांचा १८ महिन्यांचा पगार थकला होता. नवीन संचालक मंडळ सत्तेवर आल्यानंतर काही अंशी पगार अदा केले होते. दरम्यान, एकूण ३४ महिन्यांचे वेतन थकीत राहिल्याने कामगारांनी गतवर्षीची उत्पादित साखर विक्रीसाठी सोडली नव्हती. थकीत वेतनासाठी कामगारांनी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन केले होते. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून गुन्हा दाखल होणार की नाही, अशी चर्चा होती. परंतु लेखापरीक्षक फडणीस यांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अध्यक्षांसह तत्कालीन कार्यकारी संचालक, सचिव, ठेकेदार यांचा समावेश आहे. अध्यक्ष वगळता कोणत्याही संचालकांना दोषी धरलेले नाही.