कोल्हापूर : रिफ्लेक्टरशिवाय ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात कोल्हापूरच्या वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत १४ ट्रॅक्टर्सना १००० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तीन आठवड्यापूर्वी गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. रात्रीच्यावेळी रस्त्याकडेला लावलेल्या ट्रॉली दिसत नसल्याने वाहनांची धडक होण्याचे प्रकार घडले आहेत.
टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कोल्हापूर शहर वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी सांगितले की, वाहतूक नियमानुसार ऊस घेऊन जाणाऱ्या वाहनांनी पुढे आणि पाठीमागे रिफ्लेक्टर लावणे अनिवार्य आहे. आम्ही कारखान्याच्या संचालकांसोबत बैठका घेतल्या आहेत. तेही आपल्या वाहतूक करणाऱ्या वाहनांना लाईट असलेले रिफ्लेक्टर बसविण्यास तयार झाले आहेत. आम्ही शेतांमध्ये जावून वाहतूकदारांशी चर्चा आणि जागृती करीत आहोत. याशिवाय आम्ही रिफ्लेक्टरही उपलब्ध करीत आहोत.
बहुतांश अपघात शहरी विभागात आणि मुख्य राज्यमार्गावर होत आहेत. कोल्हापूरसारख्या शहरात दिवसा ऊस वाहतुकीची परवानगी नाही. वाहतूक विभागाने कारखान्यांपर्यंत ऊस पोहोचविण्यासाठी मार्ग आखून दिले आहेत. जिल्ह्यात दररोज १००० हून अधिक ट्रॅक्टर ऊस वाहतूक करतात. ट्रॅक्टर अथवा बैलगाड्या रस्त्याकडेला थांबवले जातात. राष्ट्रीय राज्यमार्ग ४८ वर रात्री वाहनांची रांग लागते. अनेकवेळा ओव्हरलोड ट्रॉल्यांचा रस्त्यात अपघात होतो. त्यामुळे अशा प्रसंगी रिफ्लेफ्टर खूप उपयुक्त ठरत आहे. दारुच्या नशेत अथवा मोठ्याने गाणी लावून वाहन चालविणाऱ्या चालकांवर दंड ठोठावण्यात येत असल्याचे गिरी यांनी सांगितले.