कोल्हापूर : ऊस शेतीच्या शाश्वत विकासासाठी साखर कारखान्याच्या शेती विभागाची मदत शासनाचा कृषी विभाग घेणार आहे. उसाच्या उत्पादन वाढीसाठी सेंद्रिय शेतीवर भर देण्याचा प्रयत्न संयुक्तरीत्या केला जाणार आहे. लागणीपासून ते उसाची तोडणी अन् उसाचा पाला शेतातच कुजविण्यासाठी पाचट अभियान राबविले जाणार आहे. या मोहिमेसाठी खर्चाची व्यवस्था डीपीडीसीतून करण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यात १ लाख ८४ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. यामध्ये ८४ हजार हेक्टर क्षेत्रात खोडवा पीक आहे. नुकत्याच झालेल्या हंगामात लावणी तुटल्यानंतर राहिलेल्या खोडव्यात याचा पहिला प्रयोग यशस्वी करण्याचे नियोजन आहे. मुळातच गत हंगामात तुटलेल्या उसाच्या उत्पन्नात घट झाली आहे. या प्रयोगामुळे नुकसान भरून काढण्याचा प्रयोग होणार आहे.
खोडवा पिकाचे सर्वसाधारण उत्पन्न कमी आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी पाचट अभियान प्रभावी ठरणार आहे. त्या संदर्भातील मार्गदर्शन दोन्ही विभागांच्या कर्मचारी, अधिकारी यांना दिले जाणार आहे, तसेच लावणीसाठी सरीतील अंतर, बियाणे, लागवडीची मात्रा, पाला कुजविणे आणि सेंद्रिय खत निर्मिती शेतातच कशी तयार करावी, याचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. ३० टक्के मशीनने तोडणी होत असल्याने पाल्याची आपोआप कुट्टी होते. उर्वरित क्षेत्रात पाचट अभियान राबविले जाणार आहे. जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीने पाचट व्यवस्थापन महत्त्वाचे असून शेतकऱ्यांनी कचरा म्हणून जाळू नये, असे आवाहन कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी केले आहे.