कोल्हापूर : राधानगरी तालुक्यात ऊस शेतीत कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘एआय’ तंत्रज्ञान प्रात्यक्षिक

कोल्हापूर : मजरे कासारवाडा (ता. राधानगरी) येथील युवराज वारके यांच्या ऊस शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यासाठी पाच जिल्ह्यांतील कृषी अधिकारी उपस्थित होते. हे तंत्रज्ञान पिकाबाबत १२ प्रकारे माहिती देते. हे तंत्रज्ञान पीक वाढीच्या कोणत्या अवस्थेत आहे, मातीपासून बी रूजणे आणि काढणीपर्यंत येणाऱ्या सर्व समस्यांबाबत माहिती देते. १२ हजार रुपयांत हे उपकरण असून, सर्व माहिती मोबाईलवर उपलब्ध होते. मातीचे तापमान, पिकाला लागणारे पाणी, पाण्याचे बाष्पीभवन, पिकाला मिळणारा सूर्यप्रकाश, पिकावर पडणारी किड, वनस्पतीच्या पानावरील आणि संपूर्ण शेतामधील आर्द्रता तसेच ओलावा, खतांची गरज अशी संपूर्ण माहिती या हायटेक तंत्रज्ञानामुळे मिळते.

पाऊस अथवा वादळ येणार असेल तर २४ तास अगोदर ही माहितीदेखील शेतकऱ्याला याद्वारे होते. मात्र, हे तंत्रज्ञान वापरताना शेतीमध्ये ठिबकसिंचन पद्धत असणे गरजेचे आहे. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक अजय कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक जालिंदर पांगरे, प्रकल्प उपसंचालक नामदेव परीट, उपविभागीय अधिकारी अरुण भिंगारदिवे, तालुका कृषी अधिकारी रमेश गायकवाड, मंडल कृषी अधिकारी दिलीप आदमापुरे, युवराज वारके, ऊसतज्ज्ञ संजीव माने, कृषी पर्यवेक्षक कल्याण कोंडे, युवराज सावंत, ओंकार गुरव आदी उपस्थित होते. मी गतसाली ११४ टन एकरी ऊस उत्पादन घेतले आहे. या एआय तंत्रज्ञानाचा वापर केल्यास एकरी दीडशे टनापर्यंत उत्पादन वाढू शकेल. असा विश्वास युवराज वारके यांनी बोलून दाखवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here