कोल्हापूर : मागील गळीत हंगामातील २०० रुपये आणि यंदाच्या गळीत हंगामातील पहिली उचल ३ हजार ७०० रुपये मिळावी यासाठी सोमवार (ता. १६) डिसेंबरपासून शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी गुरुवारी जाहीर केले. चुडमुंगे यांनी याबाबत शिरोळ तहसीलदार यांना निवेदन दिले. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. मात्र, यापूर्वी दोन वेळा शिरोळ तहसीलदारांच्या समोर बैठका झाल्या. त्यामध्ये ठरलेनुसार गुरूवारी (ता.१२) डिसेंबरपर्यंत सर्व मुद्यावर कार्यवाही करण्याचे कारखान्यांनी मान्य केले होते. पण त्याची अंमलबजावणी कारखान्यांकडून झालेली नाही. त्यामुळे आंदोलन केले जाणार आहे.
अॅग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले की, शिरोळ तहसीलदार कार्यालयात ५ डिसेंबर रोजी शिरोळ तहसील, शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्या बैठकीत १३ डिसेंबरला पुढील बैठक ठेवण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून याबाबत कसलेही गांभीर्य न ठेवता साखर कारखानदारांना बैठकीचे पत्र दिलेले नाही. साखर कारखानदारांना पाठीशी घालण्यासाठी बैठक होत नाही. क्रमपाळी सार्वजनिक करून त्यानुसार भागातील ऊस प्राधान्याने तोडावा, जानेवारी अखेर लावण आणि फेब्रुवारी अखेर खोडवा तोड व्हावी असे गावनिहाय वेळापत्रक तयार करून ऊस तोड करावी. या मुद्यांच्या पूर्ततेसाठी हे बेमुदत धरणे आंदोलन शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर १६ डिसेंबरपासून होणार आहे. त्यामुळे आंदोलन अंकुशने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.