कोल्हापूर : ऊस दराकडे शेतकऱ्यांचे लक्ष, साखर कारखानदारांचे दुर्लक्ष

कोल्हापूर : दरवर्षी शेतकरी संघटनांचे उग्र आंदोलन व्हायचे. त्यानंतर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडून पुढाकार घेतला जायचा. चर्चेच्या फेर्‍या होऊन दरावर एकमत व्हायचे. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या विषयात यंदा फारसे लक्ष दिलेले नाही. इतर शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले असले, तरी प्रत्यक्षात काही झालेले नाही. यंदा तुटणार्‍या उसाला पहिली उचल प्रतिटन ३७०० रुपये, गतवर्षीच्या उसाला प्रतिटन दोनशे रुपयांच्या मागणीवरून तालुक्यात तुरळक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. शिरोळसह जिल्ह्यात ऊस दर आंदोलन सुरू आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांचा झालेला दुसर्‍यांदा पराभव तसेच विधानसभा निवडणुकीत अपयश पदरी पडल्यानंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून यापुढे शेतकर्‍यांसाठी आंदोलन नकोच, अशी भूमिका घेण्यात येत आहे. दरवर्षी स्वाभिमानीची ऊस परिषद झाल्यानंतर दर जाहीर करण्यासाठी कारखानदारांना मुदत दिली जात होती. यानंतर कारखानदार व जिल्हाधिकार्‍यांच्या मध्यस्थीने चर्चेच्या फेर्‍या व्हायच्या. आठ-दहा दिवसांच्या चर्चेनंतर मध्यमार्ग काढून दरावर एकमत झाल्यानंतर उसाचा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू व्हायचा. स्वाभिमानी पूर्ण क्षमतेने आंदोलनात सहभागी होत नसल्याने आंदोलनावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे बहुतांश कारखान्यांना ऊस पुरवठा होत असल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here