कोल्हापूर, दि. 16 जुलै 2018 :
कोल्हापूर जिल्ह्यात आजरा, गडहिंग्लज, शाहुवाडी, गगनबावडा, राधानगरी तालुक्यात अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे अल्पावधीतच धरण भरण्याची क्षमता वाढली आहे. याशिवाय, धुव्वाधार पावसामुळे कोल्हापुरातील नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदीकाठी असणाऱ्या 20 हजार हेक्टर क्षेत्रातील ऊस पुराच्या पाण्याखाली गेला आहे. आठ दिवसात पूर ओसरला तर ठिक नाहीतर या उसाचे मोठे नूकसान होणार आहे.
जिल्ह्यात गेल्या आठ ते नऊ दिवसापासून काही ठिकाणी मूसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. याचा परिणाम ओढे, नाले भरुन वाहत आहेत. याच पाण्यामूळे नद्यांना मोठ्याप्रमाणात पूर आला आहे. पुराच्या पाण्याने गावच्या गाव वेढली आहे. तसेच, नदीकाठी असणाऱ्या वीस हजार हेक्टर क्षेत्रातील उसही पाण्याखाली सापडला आहे. चार ते पाच दिवस पाण्यात राहिल्याने उसालाही काहीही होत नाही. मात्र, त्यापेक्षा जास्त दिवस ऊस पाण्यात राहिला तर तो कुजण्यास सुरूवात होते. त्याची उंची कमी राहिते, असा विपरित परिणाम होता. सध्या दोन दिवसापासून नदीकाठचा ऊस पाण्याखाली जात आहे. दिवसें-दिवस पावसाचा जोर वाढत आहे. नद्यांमधील पाणी पातळीही वाढत आहे. अशा परिस्थिती नदीकाठचा उस तग धरून राहणे कठिण होवून बसले आहे. आठ ते दहा दिवस पाण्याखालीच ऊस राहिला तर मात्र याचा मोठा फटका बसणार आहे.