कोल्हापूर : सहकारी साखर कारखान्यांसाठी नव्या कार्यकारी संचालकांचे (एमडी) पॅनल तयार करण्यासाठी झालेल्या परीक्षेत श्री दत्त शिरोळ सहकारी साखर कारखान्यातील चिफ केमिस्ट विश्वजित विजयसिंह शिंदे हे १०० पैकी ६० गुण मिळवत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. या परीक्षेत एकूण ७४ जण उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, त्यातील ५० जणांनाच कार्यकारी संचालक तालिकेत (एमडी पॅनल) स्थान मिळणार आहे.
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी कार्यकारी संचालक पदाच्या नियुक्तीसाठी वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेने लेखी परीक्षा घेतली. त्यानंतर मुलाखतीची प्रक्रिया झाली. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ३५ टक्के गुणांची अट होती. त्यात ७४ उमेदवार बसले आहेत. मात्र पॅनल ५० जणांचेच होणार असल्याने वरील उमेदवारांना त्यात संधी मिळणार आहे. पहिला उमेदवार ६० टक्क्यांचा, तर ५० वा उमेदवार ३८.८३ टक्क्यांचा आहे.
कार्यकारी संचालकांचे पॅनल तयार करण्यासाठी सहकार विभागाने एप्रिल २०२२ ध्ये आदेश जारी केला होता. त्यानंतर मे २०२२ मध्ये साखर आयुक्तालयाने सविस्तर परीपत्रक जारी केले होते. तत्कालीन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कार्यकारी संचालकांच्या पॅनल परीक्षेत आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेत पूर्व, लेखी व मौखिक चाचणी अशा तीन टप्प्यामध्ये परीक्षा पद्धती तयार केली. मात्र, मौखिक चाचणी परीक्षेवेळी लेखी परीक्षेत अनुत्तीर्णय काही उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून निवड प्रक्रियेला आव्हान दिले होते. आव्हान याचिका फेटाळण्यात आल्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.