कोल्हापूर : ऊसतोड कामगारांच्या मुलांचे बालगृह सुरू करण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांपासून अंगणवाडी दूर असेल तर लहान मुलांसाठी बाल संस्कार गृह स्थापन करावे. प्रायोगिक तत्त्वावर, नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून याची सुरुवात सर्व कारखान्यांनी करावी. शाळा लांब असेल तर वाहनाची सोय करा, अशी सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली. त्यासाठी एक स्वयंसेवक नेमून मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी प्रयत्न करावे असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे, पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्यासह जिल्हा परिषद, आरोग्य, कामगार, महिला व बालकल्याण विभागाचे प्रतिनिधी तसेच अशासकीय सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, साखर कारखान्यांनी कामगारांच्या कुटुंबांना आरोग्य सुविधा पुरवाव्यात. रेशनसाठी कामगारांची नोंदणी करावी. कामगारांची माहिती जिल्हा स्तरावर सादर करावी. साखर कारखान्यांनी कामगारांचा डेटा बेस तयार करावा. हंगाम सुरू होण्यापूर्वी कामगार जिल्ह्यात दाखल होताच त्यांची नावे, संपर्क क्रमांक, आधार क्रमांक जमा करून जिल्हा समितीकडे पाठवावा. कामगारांना रेशन देण्यासाठी कारखान्यांनी त्यांची माहिती आणि मागणी त्या त्या तालुक्यातील तहसीलदारांकडे द्यावी, असे निर्देश त्यांनी बैठकीत दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here