कोल्हापूर : गडहिंग्लज कारखान्याच्या २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत सभासदांनी मुश्रीफ-शहापूरकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडीकडे मोठ्या विश्वासाने एकहाती सत्ता सोपवली. त्यानंतर कारखाना रुळावर येईल, अशी ऊस शेतकऱ्यांची माफक अपेक्षा होती. मात्र सत्ताधारी संचालकांमध्येच फुट पडल्याने आगामी गाळप हंगाम कारखाना घेणार कि नाही, असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. गेल्या हंगामात जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून घेतलेले ५५ कोटी व ४० कोर्टीचे साखर तारण कर्ज मिळून ९५ कोटींचे कर्ज थकले आहे. ‘अहमदाबाद’च्या स्वामी नारायण ट्रस्टकडील ३०० कोटींचे कर्ज अद्याप मिळालेले नाही. त्यात संचालकांमध्ये निर्माण झालेली दुही यामुळे यंदाच्या गळीत हंगामाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
२०२२-२३ मध्ये आर्थिक अडचणीमुळेच कारखाना बंद ठेवण्यात आला. त्यावेळी आधुनिकीकरण- विस्तारीकरण व इथेनॉल प्रकल्पासह कारखाना सुरू करण्याची घोषणा अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी केली होती.दरम्यान, जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा विनियोग नियमबाह्य झाल्याची तक्रार उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह ७ संचालकांनी साखर आयुक्तांसह जिल्हा बँकेकडे केली आहे. त्यामुळे कारखान्याचे चाचणी लेखापरीक्षण सुरू आहे. २२ जुलै २०२४ : उपाध्यक्ष चव्हाणांसह ६ संचालकांनी शहापूरकरांवर मनमानी व भ्रष्टाचाराचा आरोप करून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे संचालक पदाचे राजीनामे सुपुर्द केले आहेत. सोमवारी (दि. ५) मंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेत झालेल्या बैठकीतदेखील अनेक संचालकांनी शहापूरकरांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावेळी त्यांनी अर्थसाहाय्य उपलब्ध करण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची मुदत मागितल्याचे समजते.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.