कोल्हापूर :ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षण हमी कायद्यानुसार शालेय प्रवाहात आणून शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी भूमिका वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना कार्यस्थळी शिक्षण विभाग, कारखाना प्रशासन व महसूल विभाग यांच्यातर्फे ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत झालेल्या बैठकीत घेण्यात आली.
या बैठकीत आजरा तालुक्यात प्रत्येक गावातील शाळेत ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षण देण्याचे ठरले. समग्र शिक्षा, शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत स्थलांतरित मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात सामील करून घेण्याकरिता चार महिने उपक्रम राबविला जाणार आहे. तहसीलदार समीर माने यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यस्थळी बैठक झाली. यावेळी मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील यांनी परराज्य व परजिल्ह्यांतून आलेल्या मजुरांची माहिती दिली.
निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी शिक्षणाचे महत्त्व, स्थलांतरित मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीच्या सवलती यांची माहिती दिली. प्रभारी कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती म्हणाले, कारखाना शासनाच्या विविध सेवाभावी योजनांना नेहमीच सहकार्य करीत आलेला आहे. याआधीही साखर शाळेसारखे उपक्रम कारखान्याने राबवले आहेत.