कोल्हापूर : हरळी येथील आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याचे (गोडसाखर) संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा अशी मागणी गोडसाखर सेवा निवृत्त कामगार संघटनेने केली आहे. याबाबत प्रादेशिक सह संचालक (साखर) यांना निवेदन दिले आहे. कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा तातडीने बोलवावी, यांसह अन्य मागण्या संघटनेने केल्या आहेत. कारखाना व कंपनीने सेवानिवृत्त झालेल्या कामगारांची देय रक्कम दिलेली नाही. त्यामुळे सहाशेहून अधिक कर्मचारी व त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करण्याचे काम कंपनी व कारखाना करत आहे असा आरोप निवृत्त कामगारांनी केला आहे.
याबाबत कामगार संघटनेने सांगितले की, कंपनीने कारखाना सोडल्यानंतर गळीत हंगाम एकही वर्ष सुरळीतपणे चालवलेला नाही. सन २०१९-२० पासून आजअखेर २५ हजार सभासदांची सवलत दराची साखर दिली गेली नाही. २०१९ पासून कार्यक्षेत्रातील उत्पादित होणारा दहा लाख मे. टन ऊस कार्यक्षेत्राबाहेर गेल्याची चर्चा आहे. २०२२ पासूनचे विद्यमान अध्यक्ष, संचालक मंडळ बरखास्त करावे अशी मागणी करण्यात आली. विद्यमान अध्यक्षांनी २०२४- २५ हंगामात गुजरातमधील ट्रस्टमधून ३०० कोटींचे कर्ज उभे करण्याचे आश्वासन देत आहेत. मात्र, या कर्जाचा परतावा न झाल्यास अध्यक्ष, संचालक मंडळ जबाबदार राहणार नाही, असा बेकायदेशीर ठराव केल्याचे निवृत्त कामगारांनी सांगितले. या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत, बाळासाहेब लोंढे, सुरेश पाटील, लक्ष्मण देवार्डे, रामा पालकर, महादेव मांगले, दिनकर खोराटे, अशोक कांबळे, सदाशिव कांबळे आदींच्या सह्या आहेत.