कोल्हापूर : पंचगंगा साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत तीन महिन्यापूर्वी संपली आहे. प्रशासक नियुक्त करून कारखान्याची निवडणूक नंतर घ्यावी, अशी मागणी केंद्रीय सहकार निबंधक यांच्याकडे केल्याची माहिती रजनीताई मगदूम यांनी दिली. हातकणंगले विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. सभासदाचा कौल घेण्याऐवजी चेअरमन पी.एम. पाटील यांनी कुटनीतीने निवडणूक बिनविरोध करून घेतली.
त्या म्हणाल्या, केंद्रीय निबंधकांनी निवडणूक प्रक्रिया रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला. रत्नाप्पाण्णा कुंभार यांचा पंचगंगा कारखाना वाचविण्यासाठी सभासदांकडे कौल मागणार असल्याचे मत रजनीताई मगदूम यांनी व्यक्त केले. मगदूम म्हणाल्या, कारखान्याची निवडणूक केंद्रीय सहकार कायद्याप्रमाणे पंचगंगा कारखान्याची निवडणूक जिल्हाधिकारी यांनी स्वतः हाताळली नाही. पी. एम. पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी आणि त्यांच्या यंत्रणेला मॅनेज करून घेऊन निवडणूक बिनविरोध करून घेतली होती. पुन्हा त्याच जिल्हा महसूल यंत्रणेकडे निवडणूक घेण्यासाठी आदेश केले आहेत. हे मान्य नसल्याने केंद्रीय यंत्रणेकडे दाद मागितली असल्याचे मगदूम यांनी स्पष्ट केले. यावेळी पुंडलिक जाधव, अशोक पाटील, बाबगोंडा पाटील, रायगोंडा पाटील, सुकुमार गडगे, आण्णासाहेब शहापुरे उपस्थित होते.