कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून घेतलेले ९४ कोटी ३० लाख ७९ हजाराच्या कर्जाची परतफेड विहीत मुदतीत न झाल्यामुळे आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्व संचालकांना जिल्हा बँकेने नोटीस बजावली आहे. गेल्या गळीत हंगामात गडहिंग्लज कारखान्याने तोडणी व वाहतूक, पूर्वहंगामी अत्यावश्यक कर्ज, उसाची एफआरपी आणि साखर तारण मिळून अल्पमुदतीचे ९४ कोटी ३० लाख ७९ हजाराचे कर्ज घेतले आहे. त्यामुळे थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कायदेशीर कारवाई का करू नये ? याचा खुलासा तातडीने करण्याची सूचना नोटिसीतून केली आहे.
विहित मुदतीत कर्जाच्या परतफेडीची वैयक्तिक व सामुदायिक जबाबदारी संचालकांनी घेतली असून त्यासंदर्भातील करारनामाही बँकेला करून दिला आहे. दरम्यान, बँकेने वेळोवेळी कळवूनदेखील कारखान्याकडून कर्जाची परतफेड न झाल्याची तक्रार उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह ७ संचालकांनी केली आहे. त्यानुसार कारखान्याचे चाचणी लेखापरीक्षण सुरू आहे. त्याचा अहवाल येण्यापूर्वीच संचालकांना बँकेची नोटीस लागू झाली आहे. बँकेकडून वैयक्तिक मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता असल्यामुळे विद्यमान सर्व संचालकांचे धाबे दणाणले आहेत.