कोल्हापूर : केंद्रीय सहकार निबंधकांच्या आदेशाने पंचगंगा साखर कारखान्याची फेरनिवडणूक प्रक्रिया सुरू आहे. अशा वेळी मुदत संपलेले चेअरमन व संचालक मंडळ कारखाना प्रशासन कार्यालयाचा गैरवापर करीत आहे अशी तक्रार रजनीताई मगदूम समर्थकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी चेअरमन कार्यालयाला सील ठोकले. मगदूम गटाने निवडणुकीबाबत दहा मुद्दे उपस्थित केले आहेत. सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून निवडणुकीसाठी कार्यकर्ते, यंत्रणा कामाला लागल्याने ही निवडणूक चांगलीच गाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पंचगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीविषयी रजनीताई गटाने दहा मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. छाननीचे नियम व अटी कळाव्यात, मागील निवडणुकीतील अनामत रक्कम भरलेल्या उमेदवारांना पुन्हा शुल्क भरावे लागणार का, उमेदवारांनी किती ऊस आणि किती वर्षे पुरविला पाहिजे, याची माहिती मिळावी. सभासदाने एक वर्ष ऊसपुरवठा केला असेल तर त्याचा अर्ज बाद ठरणार का, सूचक, अनुमोदकांनी किती वर्षे ऊस पुरविला पाहिजे, सूचक, अनुमोदकांनी किती जनरल सभांना उपस्थिती लावली पाहिजे आदी मुद्यांचा यात समावेश आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.