कोल्हापूर : यंदाच्या गाळप हंगामात राज्यात साखर उत्पादनात कोल्हापूर विभाग अव्वल स्थानावर आहे. या विभागात २७८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यातील सहकारी आणि खासगी मिळून जवळपास २०७ साखर कारखाने सुरू होते. त्यातील १९० कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. आतापर्यंत एकूण १०६३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून १०८९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. एप्रिलअखेरपर्यंत राज्यातील १९० साखर कारखान्यांचा गळीत हंगाम समाप्त झाला आहे.
साखर विभागाचे प्रादेशिक उपसंचालक पांडुरंग साठे यांनी सांगितले की, गतवर्षी कमी प्रमाणात पाऊस पडल्याने यंदाच्या वर्षी ऊस गाळप कमी होईल असा अंदाज होता. मात्र उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने राज्यात १०८९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. आतापर्यंत एक लाख क्विंटलपेक्षा जास्त साखरेचे उत्पादन झाले आहे. त्यामध्ये कोल्हापूर विभागात सर्वाधिक साखरेचे उत्पादन झाले आहे. त्याखालोखाल पुणे विभाग आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात १०५२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा मात्र त्यापेक्षाही जास्त साखरेचे उत्पादन झाले आहे.