कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी साखर आयुक्तांकडे अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण व सहकाऱ्यांनी खोट्या तक्रारी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शहापूरकर यांच्या राजीनाम्यामुळे खळबळ उडाली आहे. उपाध्यक्ष चव्हाण यांच्यासह ११ संचालकांनी शहापूरकर यांच्या सहीचे अधिकार काढून घेण्यासाठी संचालक मंडळाची बैठक बोलाविण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रादेशिक साखर संचालक गोपाळ मावळे यांनी शुक्रवारी बैठक बोलवली आहे. त्यापूर्वीच शहापूरकर यांनी राजीनामा दिला आहे.
कारखान्यावर सुमारे ८५ कोटीची देणी आहेत. प्राप्त परिस्थितीत ती देवू शकत नाही. मी सभासद व कारखान्याच्या हितासाठीच आपण योग्य निर्णय घेतले असे शहापूरकर यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे. कारखान्याची गाळप क्षमता वाढ, इथेनॉल प्रकल्पासाठी मोठ्या कर्जाची गरज होती. त्यासाठी गुराजरातमधील एका ट्रस्टकडून कर्ज मंजूर करून घेतले. मात्र उपाध्यक्षांसह संचालकांच्या खोट्या तक्रारीमुळे ते कर्ज मिळू शकले नाही. कामगारांनी असहकार पुकारल्यामुळे कारखान्याचे आधुनिकीकरण व नवीन प्रकल्प सुरू करणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी कारखान्याच्या सद्यःस्थितीला अध्यक्ष शहापूरकर हेच जबाबदार आहेत. त्यांनी पळ काढला अशी टीका केली आहे. याबाबत संचालक प्रकाश पताडे, सतीश पाटील, विद्याधर गुरबे, विश्वनाथ स्वामी यांनी पत्रक प्रसिद्धीला दिले आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.