कोल्हापूर : राज्यात साखर कारखाने १५ नोव्हेंबरनंतरच सुरू करण्याची परवानगी साखर आयुक्तांनी दिली आहे; पण शेतकरी संघटनांनी केलेली ऊसदराची पहिल्या उचलीची मागणी साखर कारखानदार कितपत मान्य करतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी उसाला एफआरपीसह ३७०० रुपये दराची मागणी केली आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी असल्यामुळे साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लांबण्यासह गुऱ्हाळघरेही उशीरा सुरू होण्याची शक्यता आहे.
गुळाला चांगला हमीभाव मिळत नसल्याने आणि गुऱ्हाळघराचा खर्च परवडत नसल्याने शेतकरी ऊस कारखान्याला घालतो. ज्यांना ऊस वाहतुकीला अडचण असते किंवा लगेच पैशांची गरज असते असे शेतकरी गुऱ्हाळमालकांना टनावर अथवा गुंठ्यावर ऊस विकतात. दुसरीकडे गुळाचा दर परवडत नाही, तोटाच सहन करावा लागत असल्याने गुऱ्हाळघर चालविणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी गुऱ्हाळाची संख्याही घटली आहे. विधानसभा निवडणुकीमुळे यात आणखी उशीर होण्याची शक्यता आहे. याविषयी बसरेवाडी येथील गुऱ्हाळ मालक अमर पाटील म्हणाले की, लांबलेला परतीचा पाऊस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेली ३७०० रुपये दराची मागणी, विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, अतिरिक्त पावासामुळे उसाची खुंटलेली वाढ या सर्व घटकांचा परिणाम यंदाच्या गुऱ्हाळ हंगामावर होणार आहे.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.