कोल्हापूर : येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यामार्फत सादर केलेल्या ‘सब- सरफेस ड्रेनेज (एसएसडी) प्रकल्पाचा क्षारयुक्त माती सुधारणे आणि त्याचा साखरेच्या उत्पादनावर व उत्पादकतेवर परिणाम’ या शीर्षकाचा शोधप्रबंध व्हिएतनाम येथे होणाऱ्या शुगरकॉन-२०२४ या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेने स्वीकारला आहे. व्हिएतनाममधील आयसीआयएसएफ., क्यू न्होन, रिन्ह दिन्ह येथे १६ ते १९ सप्टेंबर यांदरम्यान होणाऱ्या आठव्या आयएपीएसआयटी आंतरराष्ट्रीय साखर परिषद आणि शुगरकॉन- २०२४ परिषदेत या प्रबंधाचे मौखिक सादरीकरण होईल. दत्त कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख व सहकारमहर्षी गणपतराव पाटील व चेअरमन रघुनाथ पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
याबाबत माहिती देताना गणपतराव पाटील म्हणाले की, ‘लवचिक जमिनीचा पॅटर्न आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला. याविषयी अभिमान वाटतो. साखर कारखान्याने जमिनीचा कस, जमिनीचा आत्मा सुधारण्याचे काम सुरू केले आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होऊन त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त होत आहे. हजारो हेक्टर जमीन सुपीक झाल्याने वर्षाला सुमारे ४०० कोटींची उलाढाल वाढली आहे. यावेळी कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक इंद्रजित पाटील, महेंद्र बागे, बाळासाहेब पाटील, अॅड. प्रमोद पाटील, दामोदर सुतार, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना, माती परीक्षण प्रमुख ए. एस. पाटील, अंबादास नानिवडेकर आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.