कोल्हापूर : ‘व्हीएसआय’कडून ‘दत्त-शिरोळ’ला सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

कोल्हापूर : शिरोळ येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याला २०२३- २०२४ मध्ये ऊस विकास योजनेअंतर्गत केलेल्या विविध कार्यक्रमांबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) कडून दक्षिण विभागातील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दि. २३ रोजी पुरस्काराचे वितरण होईल, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांनी दिली.

ऊस विकास योजनेअंतर्गत कारखान्याच्या वतीने बेणे बदलावर भर देऊन ऊस विकास कार्यासाठी अंदाजपत्रकामध्ये निधीची तरतूद करण्यात आली आहे. कारखान्याच्या वतीने एक डोळा रोप लागवडीचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला असून शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर दिलेला आहे. एकरी ऊस उत्पादनवाढीकरता शेतकरी मेळावे व प्रशिक्षण यांचे आयोजन नेहमी केले जाते. जमिनीतील सेंद्रिय कर्बवाढ, सेंद्रिय ऊस उत्पादन, शेतकऱ्यांसाठी एकरी २०० टन, तसेच नदीबुड क्षेत्रात शुगर बीट, उन्हाळी सोयाबीन, पेरू, चिकू लागवड करून पर्यायी पीक व्यवस्था जेणेकरून पूर परिस्थितीमध्ये होणारे नुकसान टाळणे असे शेतकऱ्यांसाठी नवनवीन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

कारखान्याच्या वतीने स्वतंत्र अशी माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत असते, तसेच क्षारपड जमीन सुधारण्याचा दत्त पॅटर्न संपूर्ण देशभर गाजत आहे. जवळपास दहा हजार एकर क्षेत्र क्षारपडमुक्त झालेले असून शेतकरी त्यामध्ये पीक घेत आहेत. हा पुरस्कार ऊस उत्पादक शेतकरी बंधूंनी कारखान्यावर दाखविलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे, अशी प्रतिक्रिया गणपतराव पाटील यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here