कोल्हापूर : ‘भोगावती’साठी १९ नोव्हेंबर तर बिद्री कारखान्याची ३ डिसेंबरला निवडणूक

कोल्हापूर : जिल्ह्यातील बिद्री आणि भोगावती या दोन सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये पावसामुळे स्थगित केलेला भोगावती साखर कारखाना निवडणूक कार्यक्रम २५ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. २५ जागांसाठी १९ नोव्हेंबरला मतदान होईल. तर कागल तालुक्यातील बिद्री येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी ३ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

पावसामुळे स्थगित केलेला भोगावती साखर कारखाना निवडणूक कार्यक्रम २५ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २७ जून रोजी पूर्ण झाली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव वसंत पाटील यांनी गुरुवारी पुन्हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. सध्या कारखान्यावर चेअरमन आ. पी. एन. पाटील गटाची सता आहे. सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार २५ रोजी छाननी तर २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. १० नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप होणार असून १९ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. २० नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, बिद्री येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी ३ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. २६ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. ५ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. कारखान्याच्या सत्तारूढ आणि विरोधकांमध्ये आधीच आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. साखर सहसंचालक अशोक गाडे यांनी निवडणूक कार्यक्रम तयार केला आहे.प्रस्तावित निवडणूक कार्यक्रमानुसार २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या काळात उमेदवारी अर्ज दाखल होईल. उमेदवारी अर्ज छाननी २ नोव्हेंबर रोजी होईल. तर १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. मतदान ३ डिसेंबर रोजी होणार असून ५ डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here