कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. एकूण सात कारखान्यांनी आपल्या गळीत हंगामाची समाप्ती केली आहे. यामध्ये अथर्व इंटर ट्रेड, गडहिंग्लज, बांबवडे, सदाशिव मंडलिक, तांबाळे, संताजी घोरपडे, इको केन चंदगड या कारखान्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक कोटी ४७ लाख ९ हजार ७५७ मे. टन ऊसाचे गाळप झाले आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, गाळप व साखर उत्पादनात जवाहर साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे. तर साखर उताऱ्यात दाममिया कारखान्याने बाजी मारली आहे.
कोल्हापूर आणि सांगली विभागात एकूण २ कोटी ३३ लाख १९ हजार ६७९ मे. टन ऊस गाळप झाले असून २ कोटी ६८ लाख १३ हजार ३६६ क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १ कोटी ७१ लाख ५८ हजार ६४८ क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. जवाहर कारखान्याने १४ लाख ५९ हजार १०० मे. टन उसाचे गाळप करून भरारी घेतली आहे. कारखान्याने १७ लाख ५७ हजार १०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. तर दालमिया शुगर- आसुर्ले पोर्लेने १२.९३ टक्के सरासरी साखर उताऱ्यासह अव्वल स्थान पटकावले आहे.