कोल्हापूर : जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४८ टक्के ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे. पाण्याअभावी उसाचे क्षेत्र तीस हजार हेक्टरने घटण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. रब्बी हंगामातील ८३ टक्के पेरणी पूर्ण झाली असल्याचे सांगण्यात आले. गेल्यावर्षी रब्बीची १०३ टक्के पेरणी झाली होती. मात्र, यंदा फक्त ५७ टक्के पाऊस झाला. याचा परिणाम पेरणी हंगामावर झाला आहे. उन्हाळ्यात पिकांना पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी उसाचे क्षेत्र १ लाख ८८ हजार हेक्टर होते. यंदा ते ३० हजार हेक्टरने कमी होण्याचा अंदाज आहे.
यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे चाराटंचाई आहे. शेतकरी मका पिकाकडे वळला आहे. जिल्ह्यात १३३२ हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे क्षेत्र सर्वसाधारण २१ हजार हेक्टर असते. हंगामात पाण्याअभावी या क्षेत्रात घट जाणवत आहे. ज्वारीची पेरणी कमी झाली आहे. गव्हाची १२०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून सुमारे २५ टक्के पेरण्या कमी झाल्या आहेत. तर तेरा हजार हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य पेरणी झाली आहे. हरभरा पिकाचे क्षेत्र कमी प्रमाणात लागण झाले.