ऊस तोडी सुरू: ऊस तोडणी यंत्राचा वापर
कोल्हापूर, ता. 12 : एकरकमी एफआरपी, भविष्यात साखरेला जास्त दर मिळाला तर एफआरपी व्यतिरिक्त प्रतिटन 200 रुपये या तोडग्यावर स्वाभिमानीने आपले आंदोलन मागे घेतले. त्यामुळे, यंदाचा गळीत हंगाम तोडफोड, जाळपोळ, आंदोलनाची तीव्रता न गाठता आजपासून (सोमवार) जोमाने सुरू झाला आहे. जिल्ह्यातील 23 पैकी बहुतांशी साखर कारखान्यांच्या ऊसतोड करणाऱ्या यंत्राचा वापर केला आहे.
राज्यात यावर्षीचा गळीत हंगामा 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. राज्यातील यावर्षी 195 साखर कारखाने सुरू राहतील. यापैकी कोल्हापूर जिल्ह्यात सहकारी आणि खासगी असे एकूण 23 कारखान्यांनी आपले धुराडे पेटविले आहे. यंदाच्या गळीत हंगामात साखरेचे दर कमी असल्यामुळे ऊस दराची कोंडी फुटणार नाही, आंदोलन चिघळणार अशी परिस्थिती होती. साखर कारखाने एकरकमी एफआरपी देण्यास तयार होणार नाहीत, असे अंदाज केले जात होते. मात्र, काल साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बैठकीत एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय झाला आणि आजपासून (सोमवार) साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय झाला.
हंगामाचे वैशिष्ट्ये:
– जाळपोळाशिवाय गळीत हंगाम सुरू
– ऊस तोडणी यंत्रचा वापर
– संगणीकृत ऊस मोजणी यंत्राचा वापर वाढला
– एक रकमी एफआरपी मिळणार
– उसाच्या नोंदी जास्त क्षेत्र कमी