कोल्हापूर: शिरोळ येथे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना व महाधन ग्रोटेक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि.१७) एप्रिल सकाळी ९.३० वा. कारखाना कार्यस्थळावरील शेतकरी मेळावा व गळीत हंगाम २०२४-२५ ऊस पीक स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ आयोजित केला आहे. यावेळी १०० टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन घेण्यासाठी आधुनिक ऊस शेती व शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापराबद्दल शेतीतज्ज्ञ व प्रमुख शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन होणार असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्त कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.
व्ही.एस.आय. महासंचालक संभाजी कडू-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण होणार आहे. व्ही.एस.आय.चे प्रमुख शास्त्रज्ञ आणि पीक उत्पादन व संरक्षण विभागाचे प्रमुख डॉ.ए.डी. कडलग यांचे ‘पूर्व मशागतीचे महत्त्व’ या विषयावर, कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे वरिष्ठशास्त्रज्ञ डॉ. जयवंत जगताप यांचे ‘सेंद्रिय कर्ब व त्याचे महत्त्व’ या विषयावर, राहुरी महात्मा कृषी विद्यापीठाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांचे सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान या विषयावर, मृदाशास्त्र कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विशेषज्ञ विवेक भोईटे यांचे शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर पुण्याचे सीनियर जनरल मॅनेजर बिपीन चोरगे यांचे ‘ऊस पिकातील रासायनिक खतांचा वापर’ या विषयावर सखोल व्याख्यान होणार आहे. यावेळी श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख मार्गदर्शक गणपतराव पाटील, कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, सर्व संचालक मंडळ आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.