कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात ऊस तोडणीसाठी येणारे कामगार शेतकऱ्यांकडून पैसे घेत असल्याने आंदोलन अंकुश संघटनेने आवाज उठविला होता. त्यामुळे प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर तक्रारी देण्याचे आवाहन केले होते. या ग्रुपवर शेतकऱ्यांकडून तक्रारी केल्या जात आहेत. मात्र, साखर कारखानदारांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लुट सुरूच असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून आले आहे.
आंदोलन अंकुश संघटनेचे प्रतिनिधी, साखर कारखान्याचे अधिकारी, शेतकरी संघटना व साखर सहसंचालक कार्यालयाचे प्रतिनिधी यांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपवर शेतकरी तक्रारी करत आहेत. सहसंचालक मावळे यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश देऊनही कारखाना प्रशासन ढिम्म आहे. आतापर्यंत ४५ शेतकऱ्यांनी आंदोलन अंकुश या संघटनेकडे केल्या आहेत. याबाबत आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले की, शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी तोडीबाबत आमच्याकडे तक्रारी दिल्या आहेत. यातील काही विषय स्थानिक पातळीवर सोडवले. परंतु, पैसे परत देण्याबाबत कारखान्यांनी कठोर होण्याची गरज आहे. यंदा पावसाने ऊसाचे उत्पादन घटले आहे, परंतु तोडीसाठीचा खर्च दुप्पट झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, आवाडे-जवाहर साखर कारखान्याचे शेती अधिकारी किरण कांबळे यांनी सांगितले की, मशीनने ऊस तोडीसाठी पैसे घेतल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत शहानिशा करण्याचे काम कारखाना प्रशासनाकडून सुरू आहे. दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल.