कोल्हापूर : जिल्ह्यात चालू आणि पुढील गळीत हंगाम कठीण असेल अशी शक्यता आहे. यंदा किमान तीन ते साडेतीन महिने कारखाने सुरू राहतील इतका ऊस उपलब्ध आहे. मात्र पुढील वर्षी कारखान्यांना ऊस मिळणे कठीण होईल. पुढची दोन वर्षे साखर उद्योगासाठी संकटाची असतील असे या उद्योगातील जाणकारांचे म्हणणे आहे. पुढील वर्षी कारखान्यांना उसाचा तुटवडा जाणवेल. त्यातून उसाअभावी अनेक कारखाने बंद ठेवण्याची वेळ येईल की काय? अशी भीती साखर उद्योगातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
यंदा पावसाने दडी मारली. त्यामुळे जिल्ह्यातील धरण प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांच्या आसपास पाणी साठा आहे. परिणामी उसाची नवी लागवड पूर्णपणे ठप्प आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्यावर्षी सहकारी व खासगी एकूण २२ कारखान्यांनी गाळप केले. यंदा पावसाची ४० ते ५० टक्के घट असून शेतीला पाणी किती मिळणार हे अनिश्चित आहे. त्यामुळे नवीन ऊस लागवड घटणार आहे. परिणामी कारखाने पुढच्या वर्षी चालतील की नाही, अशी स्थिती आहे. यंदा फेब्रुवारीअखेर कारखाने बंद होतील. पुढील वर्षी उसासाठी कारखान्यांमध्ये संघर्ष होईल. यंदा गेल्यावर्षीपेक्षा ४० टक्के कमी इथेनॉल उत्पादन होईल. पुढील वर्षी साखरही उपलब्ध होणार नाही, अशी चिंता या उद्योगाला भेडसावेल असे अनुमान आहे.