कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे (गोडसाखर) चेअरमन डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी राजीनामा दिल्याने कारखान्यासमोर विघ्नांचा डोंगर उभा आहे. यंदाचा हंगाम सुरू करणे हे आव्हानात्मक आहे. केवळ रक्कम उभारणी नव्हे तर तोडणी ओढणीचे नियोजन लावणे यासाठीदेखील नियोजनाची गरज आहे. अध्यक्ष डॉ. शहापूरकर यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर ही जबाबदारी कोणाच्या खांद्यावर दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील तीन हंगामाला ऊस उत्पादकांचेच सर्वाधिक हाल झाले आहेत. कमी ऊस क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना तर ऊस घालविताना अक्षरशः नाकीनऊ आल्याचे चित्र पहावयास मिळाले. याला राजकीय कंगोरे आहेत. एका ठिकाणी स्थिर सत्ता, एकहाती कारभार देऊन कारखाना चालावा यासाठी सभासदांनी मतदान केले. मात्र, तो विश्वास संचालकांनी टिकवलेला नाही. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेतर्फे ५५ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्याबाबतही तक्रारी झाल्या. आरोप-प्रत्यारोपांच्या खेळीत कारखान्याची स्थिती चिंताजनक आहे. हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने तोडणी-ओढणी, वाहतूक, कारखान्याच्या देखभाल दुरुस्तीचे नियोजन आवश्यक आहे. अध्यक्षांपाठोपाठ कार्यकारी संचालक, सचिवांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे कारखान्याचे भवितव्य ओळखून येत्या काळात नियोजन होणे आवश्यक आहे.