कोल्हापूर : काळम्मा बेलेवाडी (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने १६ ते ३१ जानेवारी २०२५ अखेरची ऊसबिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात म्हटले आहे की, या पंधरवड्यात कारखान्याने ९४ हजार ६६० टन उसाचे गाळप केले. प्रतिटन ३१५० रुपयांप्रमाणे होणारी २९ कोटी ८२ लाख रुपये रक्कम बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. याप्रमाणेच तोडणी-वाहतूकदारांची बिलेही संबंधितांच्या खात्यावर वर्ग केली आहेत.
अध्यक्ष नवीद मुश्रीफ म्हणाले, कारखान्याचे एक कोटी ६२ लाख लिटर इथेनॉल उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. त्यातील आजअखेर ९३ लाख लिटर इथेनॉल उत्पादित झाले. सहवीज प्रकल्पातून चार कोटी ४१ लाख युनिट वीजनिर्मिती झाली. त्यापैकी तीन कोटी तीन लाख ४२ हजार युनिट महावितरणला निर्यात केली. एक फेब्रुवारीपासून गाळपासाठी येणाऱ्या उसाला प्रतिटन ३२०० रुपये दर जाहीर केला आहे. फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात गाळप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.