कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील मौजे आगर येथील जायंट्स ग्रुप ऑफ दुर्गा सहेलीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील ऊसतोड मजुरांच्या वस्तींमध्ये जाऊन होळीचा सण साजरा केला. त्यांनी राबवलेल्या या उपक्रमामुळे ऊसतोड मजुरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. जायंटस ग्रुप ऑफ दुर्गा सहेलीच्या पदाधिकाऱ्यांनी ऊसतोड मजुरांसाठी पुरणपोळी वाटप करून सामाजिक बांधीलकी जोपासली. दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.
ऊस तोड मजूर गेल्या अनेक महिन्यांपासून आपला जिल्हा, नातेवाईक- सगेसोयरे यांच्यापासून शेकडो किलोमीटर दूर येऊन कष्ट करीत आहेत. या कालावधीत अनेक सण-उत्सव येत असतात. पण ते साजरे करण्यात मजुरांना मर्यादा येतात. त्यांना सणांचा आनंद घेता येत नाही. नेमकीच हीच समस्या ओळखून हा उपक्रम राबविला. यावेळी डॉ. स्नेहल कुलकर्णी, अश्विनी नरुटे, मंजुश्री मोघे, सुशीला पुजारी, नलिनी देसाई, संगीता जाधव यांच्यासह महिला उपस्थित होत्या. या उपक्रमासाठी शेखर पाटील, मनोहर माळी, संतोष दुधाळे यांचे सहकार्य मिळाले.