कोल्हापूर : मंत्री समितीने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यात १५ नोव्हेंबरपासून गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी साखर आयुक्त कार्यालयाने राज्यातील १०२ तर कोल्हापूर जिल्ह्यातील ३९ साखर कारखान्यांना २०२४-२५ चे ऊस गाळप परवाने ऑनलाईन वितरित केले आहेत. गेल्या दहा दिवसांत कोल्हापूर विभागातील कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांतील २८ कारखाने सुरू झाले आहेत. उर्वरित १२ कारखाने कधी सुरू होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. अन्य कारखान्यांनाही प्रस्तावातील त्रुटी दूर केल्यानंतर परवाने दिले जात आहेत. मात्र, कारखाने तातडीने सुरू करण्यासाठी साखर आयुक्त कार्यालय व कारखाना प्रशासन यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जर यापुढे वेळेत कारखाने सुरू झाले नाही, तर शेतकऱ्यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे १ कोटी ६५ लाख टन ऊस उपलब्ध आहे. जिल्ह्यातील आजरा शेतकरी, तात्यासाहेब कोरे वारणा, डॉ. डी. वाय. पाटील गगनबावडा, जवाहर शेतकरी, राजाराम कसबा बावडा, शाहू कागल, भोगावती सहकारी, कुंभी- कासारी हे सहकारी साखर कारखाने सुरु झाले आहेत. तर खासगींपैकी ओलम अॅग्रो, दालमिया भारत पन्हाळा, संताजी घोरपडे, दौलत, इको केन, अथणी शुगर शाहूवाडी, अथणी शुगर भुदरगड हे कारखाने सुरू झाले आहेत. यंदा विधानसभा निवडणुकीमुळे हंगाम लांबणीवर पडल्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस अद्याप शिवारात पडून आहे. तर यंदाचा ऊस दर जाहीर करावा आणि मागील थकीत रक्कम तातडीने द्यावी, अशी आग्रही मागणी विविध शेतकरी संघटनांकडून होत आहे.