पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे गळीत हंगाम सन २०२३ २४ मध्ये दक्षिण विभागामध्ये तांत्रिक विभागामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त शुगर्सला द्वितीय क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान करण्यात आला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे व त्यांच्या टीमने हा पुरस्कार स्वीकारला.
‘गुरुदत्त’चे चेअरमन माधवराव घाटगे यांनी साखर कारखान्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत साखर उद्योगात ‘गुरुदत्त शुगर्स’ला रोल मॉडेल बनवले आहे. कारखान्यातील बाहेर पडणारा धूर हवेत न सोडता बगॅस ड्रायर सिस्टिम बसवून तो बगॅसमध्ये वळवला. त्यामुळे बगॅसची ज्वलनक्षमता वाढली गेली व आर्द्रतेचे प्रमाण ४८.९४ टक्क्यांवरून ३८ टक्क्यांपर्यंत कमी होऊन हवेचे प्रदूषण कमी होऊन कारखान्याची तांत्रिक कार्यक्षमता वाढली. कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी कामगार, तोडणी ओढणी कंत्राटदार, संचालक मंडळ कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांना या पुरस्काराचे सर्व श्रेय जात असल्याचे मत चेअरमन माधवराव घाटगे यांनी व्यक्त केले.