कोल्हापूर : जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्याचा उत्तर भाग, पन्हाळा, शाहूवाडी आणि राधानगरी या तालुक्यांत गव्यांच्या कळपांकडून पिकाचे मोठे नुकसान केले जात आहे. गावांमध्ये गवे बिनधास्त येऊ लागले आहेत. त्यांच्याकडून होणारे ऊस शेतीचे नुकसान वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. वन विभागाकडून याबाबत ठोस पावले उचलावीत, अशी मागणी शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे. काही दिवसापूर्वी गव्याच्या कळपाने म्हासुर्ली (ता. राधानगरी) परिसरात शेती पिकाचे मोठे नुकसान केले. झापाचीवाडीजवळ निवृत्ती चौगुले व संतोष सुतार यांच्या शेतातील अडीच एकर उसाचे नुकसान झाले आहे.
गवे चारा आणि पाण्याच्या शोधार्थ जंगल क्षेत्रातून बाहेर पडू लागले आहेत. राधानगरी-दाजीपूर अभयारण्याला लागून असलेल्या धामणी खोऱ्यात गव्यांचा उपद्रव अधिक आहे. उन्हाळ्यामुळे जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटले आहेत. प्राण्यांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे. सध्या धामणी खोऱ्यात उसाबरोबर मका, भुईमूग व इतर पिकांची उगवण झाली आहे. गव्यांचे कळप उभी पिके फस्त करीत आहेत. म्हासुर्ली वन परिमंडळाचे वनपाल विश्वास पाटील म्हणाले की, जंगल क्षेत्राशेजारी असणाऱ्या गावांत गव्यांचा वावर वाढला आहे. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वन विभागाला माहिती द्यावी. वन विभागाच्या पातळीवर गव्यांच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न सुरू आहेत.