कोल्हापूर, ता. 19 : शहर व जिल्ह्यात रविवारी मध्यरात्रीपासून वादळी पावसाने झोडपले. वीजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने ऊस तोडणीला व्यत्यय आणला आहे. तर, गुऱ्हाळघरे तीन ते चार दिवस सुरू होणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, आज दिवसभर ढगाळ वातावरणामुळे शेतात साचून राहिलेले पाणी हटू शकले नाही.
जिल्ह्यात वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. जिल्ह्यातील 23 साखर कारखान्यांच्या सुरू असणाऱ्या ऊस तोडी पूर्णपणे बंद राहिल्या आहेत. तसेच ज्या शेतातील ऊस तोडला आहे. तो बाहेर काढतानाही ऊस तोड मंजूरांना तारेवरची कसरत करावी लागली. साखर कारखान्यांसह जिल्ह्यातील बहुतांशी गुऱ्हाळघरांनाही याचा मोठा फटका बसला आहे. गुऱ्हाळासाठी लागणारे जळण पूर्ण भिजल्याने अनेकांनी गुऱ्हाळघरांसाठीची उसतोडणी थांबविली. याचा मोठा परिणाम पुढील दोन दिवसात गुळ उत्पादनावर होणार आहे. नाचणी पिक काढणीची कामेही प्रगतीपथावर आहेत. पावसामुळे नाचणी बिजल्याने त्यांची मळणी करताना नाचणीचे नूकसान होणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून थंडी गायब झाली होती. परंतू जिल्ह्यात अंशत: ढगाळ हवामान होते. रविवार सायंकाळपासून मात्र ढगांची गर्दी वाढली. अनेक ठिकाणी गारगोटी भागात रविवार सायंकाळपासूनच पावसास सुरवात झाली. कोल्हापूर शहर व परिसरात रात्री दोन ते चार वाजेपर्यंत जोरदार पाऊस सुरु होता. रात्री चार वाजेपर्यत विविध ठिकाणी वीजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु होता. याचे परिणाम सोमवार सकाळपासून जाणवण्यास सुरवात झाली. शेतात पाणी साचून राहिल्याने कारखान्यांची उसतोडणी बंद झाली. अनेक ठिकाणी उसतोडणी यंत्रेही शेताच्या कडेलाच उभी राहिल्याचे चित्र होते. जर कडक पडले नाही तर आणखी दोन तीन दिवस तरी उसतोडणीत अडथळे येण्याची शक्यता आहे.