कोल्हापूर, ता. 20 : जिल्ह्यात जोतिबा डोंगरासह परिसरात आज दुपारी बाराच्या सुमारास मूसळधार पाऊस झाला. कुरूंदवाड, नृसिंहवाडी, करवीर तालुक्यातील काही भागामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. काल पहाटे झालेल्या जोरदार पावसामुळे आणि आजच्या पावसामुळे जिल्ह्यात सुरू असणाऱ्या ऊस तोडी पूर्णपणे बंद कराव्या लागल्या आहेत. सध्या, कारखान्यांमध्ये जेवढा ऊस शिल्लक आहे, तोच गाळप केला जात आहे. पावसामुळे उसाच्या शेतामध्ये पाणी साचल्यामुळे ऊस तोड होत नाही. तसेच तोडलेला ऊस बाहेरही काढता येत नाही अशी परिस्थिती आहे.
जोतिबा डोंगर व परीसरातील अतिवृष्टीचा फटका डोंगरावर आलेल्या भाविकांना तर झालाच मात्र या परिसरात सुरू असणाऱ्या विविध साखर कारखान्यांच्या ऊस तोडीवरही परिणाम झाला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना हवालदिल व्हावे लागले आहे. एकीकडे वेळेत ऊस तोड मिळत नाही. तर दुसरीकडे मात्र आलेली ऊस तोड पावसामुळे थांबल्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.