कोल्हापूर : गंगानगर (ता. हातकणंगले) येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती दिली. केंद्रीय सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हाधिकाऱ्यांनी राबवलेली बिनविरोध निवडणूक प्रक्रिया रद्द करत नव्याने निवडणूक लावली होती. त्याविरोधात कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील यांचे समर्थक बाबासाहेब भीमराव मगदूम (कसबा सांगाव) व इतरांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने सहा आठवड्यात केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाला म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. कारखाना सध्या रेणुका शुगर्सकडे भाडेतत्त्वावर आहे. त्याची मुदत २०२९ मध्ये संपणार आहे. दरम्यानच्या २०२५ ते २०३० या कालावधीसाठी केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाने १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली.
यामध्ये कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सर्वच जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. याविरोधात विरोधकांचे अर्ज बेकायदेशीरपणे अवैध ठरविल्याची तक्रार रजनी मगदूम यांनी प्राधिकरणाकडे केली होती. त्यानंतर प्राधिकरणाने ३ एप्रिलला निवडणूक प्रक्रियाच रद्द ठरवत, नव्याने प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवार (दि. २९) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र, बिनविरोध निवडणूक प्रक्रिया कारखान्याच्या उपविधीतील तरतुदीनुसारच राबवली होती. त्याला प्राधिकरणाने दिलेली स्थगिती अयोग्य असल्याची याचिका बाबासाहेब मगदूम यांनी दाखल केली होती. तर, ज्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राबवलेली प्रक्रिया प्राधिकरणाने रद्द ठरवली, त्यांच्यावरच पुन्हा कशी जबाबदारी दिली? अशी विचारणा विरोधी गटाकडून झाल्याचे समजते. यावर, सहा आठवड्यात खुलासा करण्याचे आदेश न्यायालयाने प्राधिकरणाला दिले आहेत.
प्राधिकरणाच्या सूचनेनुसार कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. न्यायालयाने स्थगिती दिली आहे, न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी सांगितले. पंचगंगा कारखाना अध्यक्ष पी. एम. पाटील म्हणाले कि, केंद्रीय सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या नव्याने निवडणूक घेण्याच्या आदेशाचे पालन आम्ही केले. नव्याने सभासदांच्या दारी न्याय मागत आहोत. आम्हाला सभासदांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असून त्याचे पालन करू. विरोधी आघाडीच्या नेत्या रजनीताई मगदूम म्हणाल्या कि, निवडणुकीत सभासदांचा आम्हाला मिळत असलेला पाठिंबा पाहून विरोधकांनी स्थगिती आणण्याचा डाव केला. त्यांना आता निवडणूक नको असून निवडणुकीतून पळ काढण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. न्यायालयीन लढाई-नंतर सभासदांच्या हक्काकरिता सुरू केलेला हा संघर्ष सातत्याने चालूच राहील.