कोल्हापूर : जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांना गेल्या दोन दिवसांपासून रात्री झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. पावसामुळे गुऱ्हाळांमध्ये पाणी शिरून ती बंद पडली आहेत. त्यामुळे व्यवसायातील अडचणींशी झुंज देत असलेल्या गुऱ्हाळघर मालकांची आणखी कोंडी झाली आहे. जोरदार अवकाळी पावसाने गुऱ्हाळघरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे ही गुऱ्हाळघरे बंद झाली. ऐन हंगामात हा फटका बसल्याने गुऱ्हाळमालक हवालदिल झाले आहेत.
सध्या गळीत हंगामाने गती घेतली आहे. साखर कारखान्यांकडून जोरदार गाळप सुरू आहे. काल झालेल्या पावसाचा हंगामाच्या तोडीवर काहीही परिणाम नाही. तथापि, ढगाळ वातावरण आणि पावसामुळे उसाच्या उताऱ्यात घट होण्याची भीती आहे. पावसाचे पाणी शेतात साचून राहिल्यास त्या शेतातील साचलेले पाणी उसाच्या मुळात शिरले तर त्याचा परिणाम उताऱ्यावर होतो. गुऱ्हाळघरांची स्थिती मात्र बिकट बनली आहे. पूर्वी जिल्ह्यात जवळपास १३०० गुऱ्हाळघरे होती; पण गुळाला योग्य भाव नसल्याने व कामगार टंचाई या कारणाने अनेक गुऱ्हाळे बंद पडली. सध्या जेमतेम दोनशे गुऱ्हाळे सुरू आहेत. आता थंडीच्या हंगामात अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने लोकांमध्ये गोंधळाचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत गुळ उत्पादक शेतकरी भगवान काटे म्हणाले की, गुळाला भाव नाही, कामगार मिळत नाहीत, अशा अनेक अडचणींचा सामना करत गुऱ्हाळघर चालक गुळ उत्पादन करीत आहेत. पूर्वी मोठ्या प्रमाणात असलेली गुऱ्हाळघरांची संख्या आता हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आली आहे. त्यातच अवकाळी पावसाने गुऱ्हाळमालकांना पुन्हा अडचणीत आणले आहे.