कोल्हापूर : साखर कारखान्याचा हंगाम सुरू होण्यास अद्याप जवळपास दोन महिन्यांचा अवधी बाकी असताना शिरोळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये उसावर पांढऱ्या लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. उसाची वाढ आठ ते दहा फुटांपर्यंत झाल्याने फवारणी करणे कठीण बनले आहे. अनेक ठिकाणी लोकरी माव्याचा प्रादुर्भाव असलेल्या ऊस पडल्यानेदेखील उपाययोजना करणे कठीण बनले आहेत. अशा स्थितीत लोकरी माव्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. ज्या शेतात अद्याप लोकरी मेव्याचा प्रादुर्भाव कमी आहे अशा ठिकाणी ऊस काढून नष्ट केला जात आहे.
अद्याप ऊस तोडीच्या हंगामाला दोन महिन्यांचा कालावधी आहे.यावर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईची स्थिती होती. त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतातील ऊस चाऱ्यासाठी विक्री केला. शिरोळ तालुक्यातील ऊस चाऱ्यासाठी जत, विटा, आटपाडी या भागात मोठ्या प्रमाणावर नेण्यात आला. अनेक शेतकऱ्यांच्या उसाचे महापुरात बुडून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसाळ्यात कमी दिवसांत जादा पाऊस पडला. परिणामी पाणी साचून राहिलेल्या जमिनीतील उसाची वाढ खुंटली आहे. अशात लोकरी माव्याचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.