कोल्हापूर : राहुरीस्थित महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून प्रस्ताव मंजूर झाल्याने आगामी काळात राधानगरीत स्वतंत्र ऊस प्रजनन केंद्र उभारण्यात येणार आहे. प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे सादर झाला आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रस्तावित केंद्र मंजुरीसाठी पाठपुरावा केल्याने पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रानंतर हे दुसरे ऊस प्रजनन केंद्र सुरू होणार आहे.
कृषी विद्यापीठाच्या येथील कृषी संशोधन केंद्राला वैशिष्टयपूर्ण (युनिक) दर्जाच्या केंद्रात समावेश आहे. या केंद्रात गेल्या दशकांपासून भाताबरोबरच ऊस पिकाचेही संशोधन सुरू झाले आहे. सध्या उसाच्या प्रचलित जातीच्या संकरातून नवीन जात विकसित करण्यात येते. केंद्राने उसाच्या नवीन जाती विकसित करण्यावर भर दिला आहे. मात्र, नवीन जातीच्या संशोधनावर आर्थिक आणि संसाधनांची मर्यादा पडत आहे. यातूनच कोईमतूरच्या धर्तीवर स्वतंत्र ऊस प्रजनन केंद्राची संकल्पना कृषी विद्यापीठाने पुढे आणली. सद्यःस्थितीत ऊस संशोधन कार्य राधानगरी कृषी संशोधन केंद्रातून सुरू आहे. येथील क्षेत्र अपुरे पडत असल्याने नवीन ऊस प्रजनन केंद्र हत्तीमहाल येथील कृषी विभागाच्या क्षेत्रात सुरू करण्यात येणार आहे.
कृषी विद्यापीठाने प्रस्तावित केंद्रासाठी कृषी विभागाकडे पाच हेक्टर क्षेत्राची मागणी केली आहे. लवकरच हे क्षेत्र कृषी संशोधन केंद्राकडे हस्तांतरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. उसाच्या नवीन वाणांची निर्मिती संकरीकरणातून करण्यात येते. उसाला येणारा फुलोरा हा विशिष्ट हवामानाशी निगडित असतो. उसाला फुलोरा येण्यासाठी येथील वातावरण पोषक आहे. योग्य तापमान, पावसाचे अधिक प्रमाण यातून प्रस्तावित ऊस प्रजनन केंद्रातून उसाचे नवीन वाण विकसित होण्याचा आलेख वाढणार आहे. उसाच्या नवीन जाती विकसित करण्यापूर्वी फुलोऱ्याची आवश्यकता असते.
सध्या आंबोली येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे ऊस प्रजनन केंद्र सुरू आहे. तेथील पोषक वातावरण, तापमान, पाऊस, राधानगरी प्रमाणेच आहे. त्यामुळे उसाच्या नवीन वाणांचे प्रजनन/संशोधन प्रस्तावित केंद्रामुळे अधिक व्यापक होणार आहे. येथील कृषी संशोधन केंद्रात या आधी सुरू असलेल्या संशोधन केंद्राचे बळकटीकरणही प्रस्तावित आहे. अधिकाधिक ऊस संशोधन करण्यासाठी पाडेगाव कृषी संशोधन केंद्राबरोबरच राधानगरीत उपलब्ध असलेल्या ऊस संकरिकरण संचाची उभारणी प्रस्तावही कृषी विद्यापीठाने राज्य शासनाला मंजुरीसाठी सादर केला आहे.