कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यापासून उन्हामुळे गुऱ्हाळ बंद होण्याची संख्या झपाट्याने वाढत आहे. यंदा गेल्या वर्षीपेक्षा कमी संख्येने गुऱ्हाळे सुरू झाल्याने गुळाची आवक जेमतेमच होती. आता आवक घटू लागल्याचा परिणाम दिसून लागला आहे. बाजार समितीत गुळाच्या आवकेत घट झाल्याने दरात प्रती क्विंटल १०० रुपयांपर्यंत वाढ झाली. सध्या गुळाचा दर सरासरी ३६०० ते ४००० रुपये प्रती क्विंटल असा आहे.
‘ॲग्रोवन’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मकर संक्रांतीदरम्यान गुळाचे दर ४००० रुपयांवर गेले होते. पण नंतर त्यात घसरण झाली. मागणी नसल्याने अपेक्षेप्रमाणे गूळ दरवाढ झालेली नाही. गुढी पाडव्यापासून गुळाचे सौदे एक दिवसाआड होत आहेत. वाढत्या उन्हाचा फटका कारखान्यांच्या ऊस तोडणी यंत्रणेला बसला, तसाच गुऱ्हाळघरांच्या ऊस तोडणी यंत्रणेलाही बसला. सध्या गुऱ्हाळांवर स्थानिक मजूर आहेत. कडक उन्हामुळे ऊस तोडणी करणे अशक्य बनत आहे. त्यामुळे अनेकांनी गुऱ्हाळ बंद ठेवणे पसंत केले. त्याचा परिणाम गुळाच्या आवकेवर दिसून येत आहे. गुजरातमधील व्यापाऱ्यांना डिसेंबर, जानेवारीत गुळ खरेदी केली. नंतर व्यापाऱ्यांनी अतिरिक्त खरेदी थांबविली. गूळ खरेदीसाठी स्पर्धा न झाल्याने दर वाढलेले नाहीत.