कोल्हापूर : ऊस दराच्या बैठकीला हिवाळी अधिवेशनाचा अडसर ? २४ डिसेंबरनंतरच निर्णय शक्य

कोल्हापूर : मागील हंगामात गाळप झालेल्या उसाला उर्वरित प्रतिटन दोनशे रुपये व चालू हंगामातील उसाला प्रतिटन ३७०० रुपये दर द्या, अशी मागणी स्वाभिमानीसह जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी केली आहे. याबाबत प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी साखर कारखानदार व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक सोमवारी बोलावली होती. पण, या बैठकीकडे साखर कारखानदारांनी पाठ फिरवल्याने संघटना आक्रमक झाल्या आहेत. ऊस दरावरून साखर कारखानदार व शेतकरी संघटनांमधील बैठकीला मंत्रिमंडळ विस्तार आणि हिवाळी अधिवेशनाचा अडसर ठरला आहे. अधिवेशन २१ डिसेंबरला संपणार आहे. मात्र, सद्यस्थिती पाहता २४ डिसेंबरनंतर बैठक होईल अशी शक्यता आहे.

जिल्ह्यातील सहा कारखान्यांचे नेते हे आमदार आहेत. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात ते व्यस्त आहेत. त्याचबरोबर, त्यानंतर १६ ते २१ डिसेंबरपर्यंत नागपूर येथे हिवाळी अधिवेशन आहे. त्यामुळे चर्चा होण्याची शक्यता धूसर आहे. अधिवेशन संपल्यानंतर साधारणता २४ डिसेंबरनंतरच बैठक होऊ शकते. साखर कारखानदारांसोबतच्या बैठकीत योग्य तोडगा निघाला नाहीतर शेतकरी संघटना आक्रमक होणार आहेत. शासनाने मध्यस्थी करण्याची गरज असल्याचे मत साखर उद्योगातूनही व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here