कोल्हापूर : आगामी काळात ऊस उत्पादन वाढीसाठी एआयसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराशिवाय पर्याय नाही. पारंपरिक पद्धतीने ऊस शेती करून उत्पादनात अपेक्षित वाढ होत नाही. एआयसारख्या तंत्रज्ञानाद्वारे ऊस शेतीत पन्नास टक्के उत्पादनात वाढ झाल्याचे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. त्यामुळे एआय तंत्रज्ञान वापरासाठी शाहू कारखाना प्रोत्साहन देणार आहे, असे प्रतिपादन राज्य साखर संघाच्या संचालिका व शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले. श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या ऊस विकास योजनेंतर्गत विविध योजनांतील लाभार्थी सभासद शेतकऱ्यांना अनुदान धनादेश वाटपप्रसंगी त्या बोलत होत्या.
सुहासिनीदेवी घाटगे म्हणाल्या की, स्व. विक्रमसिंह घाटगे यांनी ऊस विकास योजना व ऊस पीक परिसंवाद संकल्पना यशस्वीपणे राबविली. यामध्ये सभासद शेतकऱ्यांसोबत मी स्वतः सहभागी झाले. यामधून नवीन तंत्रज्ञान समजले. याचा फायदा ऊस उत्पादनवाढीसाठी माझ्यासह सर्व शेतकऱ्यांना झाला. यावेळी कारखाना कार्यस्थळावर शेतकऱ्यांसाठी २४ एप्रिलला प्रशिक्षण कार्यशाळा घेणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी दिली. प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास व कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक सचिन मगदूम, शिवाजीराव पाटील उपस्थित होते. शेती अधिकारी दिलीप जाधव यांनी स्वागत केले.