कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १६ सहकारी व ७ खासगी असे एकूण २३ साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामात भाग घेतला आहे. यापैकी २२ कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला. यामध्ये सर्वाधिक ऊस दर कुंभी, पंचगंगा आणि दालमिया या साखर कारखान्यांनी जाहीर केला आहे. कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) गोपाळ मावळे यांनी ही माहिती दिली. कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना, पंचगंगा सहकारी साखर कारखाना व दालमिया या कारखान्यांनी जिल्ह्यात सर्वाधिक ३३०० रुपये प्रती टन तर राजाराम कारखान्याने जिल्ह्यात सर्वात कमी ३०५० रुपये प्रती टन एफआरपी जाहीर केली आहे. उर्वरित कारखान्यांची एफआरपी ३३०० रुपये ते ३०५० रुपये प्रतीटन यांदरम्यान आहे.
दरम्यान, प्रादेशिक सहसंचालक मावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सर्व २३ सहकार व खासगी साखर कारखान्यांनी गाळप परवाने घेतले असून, गळीत हंगाम २०२४-२५ चे ऊस गाळप सुरु केले आहे. कारखान्यांनी गाळप केलेल्या ऊसाचे १४ दिवसात देय एफ.आर.पी. प्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांना अदा करणे ऊस (नियंत्रण) आदेश, १९६६ मधील कलम ३ (३) च्या तरतूदीनुसार बंधनकारक आहे. विलंब झाल्यास १५ टक्क्यांप्रमाणे होणारे व्याज आकारण्याची तरतूद आहे. याशिवाय, एफआरपी दरापेक्षा जास्त दर द्यावयाचा असल्यास कारखान्यांनी तो निश्चित करुन हंगाम सुरु करण्यापूर्वी त्याची माहिती वर्तमानपत्र व कारखाना स्थळावर प्रसिध्द करणे बंधनकारक आहे.