कोल्हापूर : श्री दूधगंगा – वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज गणपतराव फराकटे यांची निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक उपसंचालक (साखर) जी. जी. मावळे यांच्यासह कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील प्रमुख उपस्थित होते. फराकटे यांचे नाव संचालक प्रवीणसिंह पाटील यांनी सुचवले. त्याला सुनील सूर्यवंशी यांनी अनुमोदन दिले.
निवडीनंतर अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या हस्ते नूतन उपाध्यक्ष मनोज फराकटे यांचा सत्कार करण्यात आला. कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे यांचे वडील गणपतराव फराकटे यांचे २४ ऑगस्ट २०२४ रोजी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर सुमारे सात महिने उपाध्यक्षपद रिक्त होते. त्या जागेवर गुरुवारी मनोज फराकटे यांची निवड झाली. यावेळी सर्व संचालक, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले, अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फराकटे घराण्यातील तिसरे संचालक
बोरवडेचे माजी सरपंच कै. ज्ञानदेव गुंडू फराकटे हे नूतन संचालक मनोज फराकटे यांचे ज्येष्ठ चुलते होत. ज्ञानदेव फराकटे हे १९९५ ते २००० या काळात ‘बिद्री’चे संचालक होते. मनोज यांचे वडील गणपतराव फराकटे हे २००५ पासून सलग वीस वर्षे ‘बिद्री’चे संचालक होते. त्यांनी दोन वेळा कारखान्याचे उपाध्यक्षपद सांभाळले होते. आता मनोज यांच्या रुपाने फराकटे घराण्याला ‘बिद्री’त तिसऱ्यांदा उपाध्यक्षपदी संधी मिळाली आहे.