कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना गुजरातमधील स्वामी नारायण ट्रस्ट (अहमदाबाद) यांच्याकडून ३०० कोटी रुपयांचे कर्ज घेत आहे. या कर्जास हरकत असल्याचे निवेदन चंद्रकांत सावंत यांनी साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांना दिले आहे. हे कर्ज विना संचालक उत्तरदायीत्व असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याचबरोबर कारखान्याने जिल्हा बँकेकडून घेतलेल्या ५५ कोटी रुपये कर्जाच्या विनियोगाच्या अनियमिततेबाबत शासकीय लेखा परीक्षण होऊन कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत सावंत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वामी नारायण ट्रस्टकडून विनासंचालक- उत्तरदायित्व ३०० कोटी रुपयांच्या कर्जामुळे साखर कारखाना कर्जाच्या खाईत लोटून त्याच्या अस्तित्वाच्या भवितव्यास धोका संभवतो. यामुळे या कर्जास कारखान्याच्या सभासदांचा तीव्र विरोध असल्याने हा विषय वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या मान्यतेसाठी ठेवावा. याचबरोबर कारखान्याने जिल्हा बँकेकडून घेतलेल्या ५५ कोटी रुपयांच्या कर्जाबाबत लेखापरीक्षण करण्यात यावे. या रकमेच्या वापराबाबत अनियमितता आहे. कारखाना दुरुस्ती-नूतनीकरणाकरिता ब्रँडेड ऐवजी जुने मटेरियल वापरण्यात आल्याने कारखाना पूर्ण क्षमतेने चालला नसून तोट्यात भर पडल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.