कोल्हापूर : साखरेला प्रतिकिलो ४२ रुपये हमीभाव देण्याची आमदार चंद्रदीप नरके यांची मागणी

कोल्हापूर : साखरेचा उठाव होत नसल्याने गेल्या काही वर्षांत साखर कारखान्यांना तोटा सहन करावा लागला. साखर कारखानदारी टिकून ऊस उत्पादकांना योग्य दर द्यायचा असेल, तर केंद्राने साखरेला प्रतिकिलो ४२ रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी केली. कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात उत्पादित ६ लाख २५ हजार ५० क्विटल साखर पोत्यांचे पूजन गुडीपाढव्याचे औचित्य साधून कारखान्याचे अध्यक्ष, आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते आणि संचालक प्रकाश पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी भारती पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. साखर कारखान्याच्या ६२ व्या गळीत हंगामाची सांगता झाली.

आ. नरके म्हणाले, चालू गळीत हंगामात एकूण गाळप ४ लाख ९४ हजार २८१ मेट्रिक टन झाले असून, ६ लाख २५ हजार क्विटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. सरासरी उतारा १२.६५ टक्के आहे. १५ फेब्रुवारी अखेर ३३०० प्रमाणे एफआरपी जमा केली आहे. उर्वरित १६ फेब्रुवारी ते हंगाम समाप्ती पर्यंतची संपूर्ण बिले एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात अदा करण्यात येणार आहेत. सहवीज प्रकल्प युनिट उत्पादन ४ कोटी ९ लाख २४ हजार इतके झाले असून, कारखानाअंतर्गत वापर १ कोटी ५६ लाख ८१ हजार युनिट झाला आहे. दोन कोटी ४२ लाख ४३ हजार युनिट वीज महावितरण विक्री केली आहे.

ते म्हणाले, सध्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. इथेनॉल प्रकल्प साखर उद्योगासाठी फायदेशीर ठरू शकतो. पुढील हंगामासाठी कारखान्याकडे ८ हजार ८८३ हेक्टर उसाची नोंद झाली आहे. पुढील वर्षी सर्वांनी कारखान्यासाठी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन नरके यांनी केले. यावेळी संचालक अनिल पाटील, विलास पाटील, अॅड. बाजीराव शेलार, उत्तम वरुटे, दादासो लाड, किशोर पाटील, सर्जेराव हुजरे, विश्वास पाटील, सरदार पाटील, अनिष पाटील, कामगार प्रतिनिधी, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, सेक्रेटरी प्रशांत पाटील, सर्व विभागाचे विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here