कोल्हापूर : आजरा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी जागा वाटपावरून चर्चा फिस्कटली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका बदलत निवडणुकीतूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कारखाना निवडणुकीला वेगळी कलाटणी मिळाली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. त्यानंतर आपला निर्णय जाहीर केला. निवडणूक बिनविरोध होणार कि लागणार ? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सोमवारी कारखाना निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत जिल्ह्यातील नेत्यांनी गटप्रमुखांना बोलावले होते. दुपारनंतर चर्चेच्या तीन फेऱ्यांमध्ये प्रत्येकाचे मत आजमावून घेत एकत्र बैठक घेतली. त्यामध्ये राष्ट्रवादी ७, अशोक चराटी गट ८, अंजना रेडेकर गट २, शिवसेना गट २ व शिंपी गटाला २ अशा जागा जाहीर केल्या. मात्र, राष्ट्रवादीने ९ जागांची मागणी केली. राष्ट्रवादी सोडून इतरांचे समाधान झाले. त्यामुळे राष्ट्रवादीने वेगळी खेळी केल्याचे म्हटले जात आहे.
कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणातील अशोक चराटी गट, अंजना रेडेकर, शिंपी गट व शिवसेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. कारखाना बिनविरोध व्हायचा मार्ग सुकर झाला असला राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. याशिवाय याचा परिणाम कारखान्यावरही होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीमधील भरलेल्या अर्जांचा विचार करता कुणालाही समाधान करता येणार नाही. कार्यकर्ते नाराज होतील. आपल्या पक्षामुळे कारखाना निवडणूक लागली, तर कारखान्यावर आर्थिक बोजा पडेल अशी भूमिका मांडत राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी निवडणुकीतून सामुदायिकपणे माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. कारखाना हितासाठीच हा निर्णय असून यामध्ये नाराजी नाही, असा दावा करण्यात आला आहे.